| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
यवत (ता. दौंड) परिसरात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे गावात सलग तिसऱ्या दिवशीही बंद पाळण्यात येत आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार गावात जमावबंदी लागू असून, अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवण्यात आली आहे. गावात चोख पोलिस बंदोबस्त असून सध्या शांततेचे वातावरण आहे.
शुक्रवार दि. १ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर टाकलेल्या आक्षेपार्ह पोस्टमुळे गावात तणाव निर्माण झाला होता. या घटनेनंतर काही भागांत दगडफेक व जाळपोळ झाल्याने पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती.
त्यानंतर प्रशासनाने जमावबंदीचे आदेश लागू केले असून, गावात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. नागरिकांमध्ये सध्या शांतता आहे; मात्र बाजारपेठ पुन्हा कधी सुरु होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या व्यक्तीस मंगळवार दि. ५ ऑगस्ट पर्यंत तर जाळपोळ व दगडफेक प्रकरणातील काही संशयितांना बुधवार दि. ६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. यवत प्रकरणाची चौकशी पोलीस प्रशासनाकडून सुरू असून, पुढील काळात आणखी अटकांची शक्यता वर्तवली जात आहे.
