| मुंबई : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या e-KYC प्रक्रियेसाठी दिलेली अंतिम मुदत राज्य सरकारने वाढवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी १८ नोव्हेंबर २०२५ ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र गेल्या काही दिवसांत झालेल्या नैसर्गिक आपत्ती आणि निर्माण झालेल्या अडचणींमुळे अनेक लाभार्थी बहिणींना e-KYC वेळेत पूर्ण करता आले नाही. या परिस्थितीची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने e-KYC ची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत वाढवली आहे.
दरम्यान, ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत, तसेच घटस्फोटीत महिलांनी e-KYC करताना संबंधित मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट प्रमाणपत्र किंवा न्यायालयीन आदेशाची सत्यप्रत आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे अनिवार्यपणे जमा करणे आवश्यक आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे योजनेतील लाभ सातत्याने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय लाभार्थ्यांना मिळत राहणार आहेत. अद्याप e-KYC न केलेल्या बहिणींना ही प्रक्रिया वेळ न दवडता पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

