| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
यवत ( ता, दौंड ) येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ता तसेच महासंघाचे राज्य कार्यकारणी सदस्य राहुलकुमार दत्तात्रय अवचट यांना माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनतर्फे उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार २०२५ प्रदान करण्यात आला.
सोलापूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यव्यापी माहिती अधिकार कार्यकर्ता अधिवेशनात निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सन्मान करण्यात आला. अधिवेशनाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष सुभाष बसवेकर, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय किणीकर, प्रसिद्धीप्रमुख राहुल कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी जितेंद्र भावे यांनी माहिती अधिकार कार्यकर्ते आणि निर्भय महाराष्ट्र पार्टीचे कार्यकर्ते यांनी प्रशासनातील भ्रष्टाचाराविरोधात एकत्रितपणे लढा द्यावा, असे आवाहन केले.तसेच सुभाष बसवेकर यांनी माहिती अधिकाराबरोबर इतर कायद्यांचा देखील सखोल अभ्यास करण्याचे मार्गदर्शन कार्यकर्त्यांना केले.
२०१७ पासून माहिती अधिकार क्षेत्रात कार्यरत असलेले राहुलकुमार अवचट हे गेल्या दहा वर्षांपासून नागरिकांना माहिती अधिकार अर्ज, प्रथम व द्वितीय अपील तसेच तक्रारी याबाबत मार्गदर्शन करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना उत्कृष्ट माहिती अधिकार पुरस्कार २०२५ देऊन सन्मानित करण्यात आले.
पुरस्कार स्वीकारताना अवचट यांनी मार्गदर्शक सुभाष बसवेकर, प्रशिक्षक रेखा साळुंखे, यशदाचे दादू बुळे तसेच पुणे जिल्ह्यातील सर्व सहकारी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
“हा पुरस्कार वैयक्तिक नसून माहिती अधिकार कायद्याच्या प्रचार–प्रसारासाठी काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा आहे. नागरिकांनी कायद्याचा अधिक वापर करावा, हीच खरी जबाबदारी आहे,” असे अवचट यांनी यावेळी सांगितले