| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्यूज मराठीसाठी
यवत गावात काही दिवसांपूर्वी घडलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेली जमावबंदी अखेर हटवण्यात आली आहे. यानंतर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) पत्रकार परिषद घेऊन आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी यावेळी गावकऱ्यांनी शांतता राखत घेतलेल्या सामूहिक भूमिकेचं कौतुक करत दोषींवरच कारवाई होईल, असा विश्वास व्यक्त केला.
“या प्रकरणाकडे मी सुरुवातीपासूनच लक्ष ठेवून आहे. यवतमध्ये जे काही घडलं, ते दुर्दैवी होतं. यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी ग्रामस्थांनी पक्ष, जात, पात, आडनाव न पाहता एक गाव म्हणून निर्णय घेणं गरजेचं आहे.” असं कुल यांनी स्पष्ट केलं.
ते पुढे म्हणाले, “गोंधळात बऱ्याच जणांची नावं आली आहेत, पण कारवाई फक्त खऱ्या दोषींवरच व्हावी, हीच आमची भूमिका आहे. गावात पुन्हा शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रशासन, पोलिस आणि ग्रामस्थांनी मिळून प्रयत्न करावेत.”
घटनेनंतर लगेचच पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या असल्याचं सांगत, कुल म्हणाले, “धार्मिक भावना दुखावू शकणाऱ्या ठिकाणी ऑल कंपाऊंड व ग्रील उभारली जाणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांना जबाबदारी देण्यात येणार आहे. दररोज जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्कात होतो आणि त्यांच्या सल्ल्यानंतरच जमावबंदी उठवण्यात आली.”
गावकऱ्यांना आमदार कुल यांचे आवाहन
“कोणी चुकीचं वागल्यास कायदा हातात न घेता थेट पोलिसांत तक्रार द्यावी. दोषींना पाठिशी घालणार नाही आणि मदत करणाऱ्यांवरही चौकशी होईल. तरुणांनी संयम बाळगावा,” असं आवाहनही त्यांनी केलं.