| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील यवत गावामध्ये रविवार (दि. २६) पहाटेच्या सुमारास नीलकंठेश्वर मंदिरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अज्ञात समाजकंटकाने विटंबना केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर सकल हिंदू समाजाच्या भावना तीव्र दुखावल्या असून, गावात संपूर्ण कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
यवत पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. सकाळपासून गावातील सर्व दुकाने, हॉटेल्स, व्यवसाय पूर्णतः बंद ठेवण्यात आले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

हिंदू-मुस्लिम समाजाकडून एकत्रित निषेध
या घटनेविरोधात यवत गावातील हिंदू आणि मुस्लिम समाज बांधवांनी एकत्र येत निषेध मोर्चा काढला. कालभैरवनाथ मंदिरासमोर झालेल्या निषेध सभेत दोन्ही समाजांचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम समाजानेही आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत आपली एकजूट दाखवून दिली आहे.
पोलीस प्रशासन सतर्क, आरोपी लवकरच जेरबंद होणार – यवत पोलीस
घटनेनंतर पोलीस प्रशासनाने गावात मोठा बंदोबस्त तैनात केला असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्कता बाळगली जात आहे. दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांनी ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन करत सांगितले की,आरोपीचा लवकरच तपास लावून त्यास अटक करण्यात येईल. अशा मानसिक विकृतीच्या व्यक्तींना पोलीस यंत्रणा कधीही पाठीशी घालणार नाही. नागरिकांनी कायदा हातात न घेता सहकार्य करावे.
गाव बंद व प्रतिमास्थापनेवर ठाम भूमिका
यवत ग्रामस्थांनी स्पष्ट केले आहे की, जोपर्यंत आरोपीस अटक होत नाही, तोपर्यंत गाव बंद राहील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्याने प्रतिष्ठापना केली जाणार नाही.

