| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील यवत गावात मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या तणावानंतर आता परिस्थिती हळूहळू पूर्वपदावर येत आहे. स्थानिक प्रशासनाने जमावबंदीमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिली असून, सकाळी 6 ते सकाळी 11 वाजेपर्यंत बाजारपेठा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार यवत गावातील नागरिकांना आवश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी पाच तासांची सवलत देण्यात आली आहे. मात्र, सकाळी 11 वाजल्यानंतर पुन्हा एकदा संपूर्ण गावात जमावबंदी लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी फक्त आवश्यक कामासाठीच बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान, यवत गावात पाचव्या दिवशी काही दुकाने हळूहळू सुरू झाली असून, बाजारपेठेत शांततेत खरेदी-विक्री होताना दिसत आहे. पोलीस बंदोबस्त मात्र पूर्वीप्रमाणेच चोख ठेवण्यात आला आहे, आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे.
गावात पुन्हा तणाव निर्माण होऊ नये म्हणून सोशल मीडियावर कडक नजर ठेवली जात आहे. अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.