|मुंबई : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा यासाठी आता या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://ladakibahin.maharashtra.gov.in e-KYC ची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभार्थ्यांनी पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

ही प्रक्रिया मोबाईलवरूनही सोप्या पद्धतीने करता येईल. त्याचबरोबर भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठीही ही प्रक्रिया उपयुक्त ठरणार असल्याचे तटकरे यांनी स्पष्ट केले.

महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी तसेच कुटुंबात त्यांची निर्णायक भूमिका बळकट करण्यासाठी शासनाकडून “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजना राबवली जात आहे. या योजनेतून थेट लाभ हस्तांतरण (Direct Benefit Transfer) द्वारे आर्थिक सहाय्य दिले जाते. आता e-KYC द्वारे लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात येणार असून महिला स्वत:च्या मोबाईलवरूनही ही प्रक्रिया पूर्ण करू शकतील.

मंत्री तटकरे यांनी लाभार्थ्यांना गोंधळून न जाता ही प्रक्रिया पूर्ण करावी तसेच कोणत्याही आर्थिक मागणीला बळी पडू नये, असेही आवाहन केले आहे.

| पुढील प्रमाणे  E-KYC आपण करू शकता
) https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळ ओपन करा.
२) त्यानंतर मुखपृष्ठावरील e-KYC बॅनर वर क्लिक करून फॉर्म उघडा.
३) फॉर्ममध्ये आधार क्रमांक व पडताळणी संकेतांक (Captcha Code) नमूद करून Send OTP वर क्लिक करा.
४) आधार-लिंक मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकून Submit बटण दाबा.
५) प्रणाली तपासेल की KYC आधीच पूर्ण झाली आहे का.
जर पूर्ण झाली असेल तर “e-KYC आधीच पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.
६) जर पूर्ण झाली नसेल तर आधार क्रमांक पात्र यादीत आहे की नाही ते तपासले जाईल.
७ ) जर आधार क्रमांक पात्र यादीत असेल तर लाभार्थ्याने पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक व Captcha भरून पुढील टप्पा पूर्ण करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *