| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील मलटण येथील वनक्षेत्रात वन विभागाच्या रस्त्याचा वापर करून बेकायदेशीर माती वाहतूक केली जात असल्याची तक्रार स्थानिक ग्रामस्थांनी दौंड वनविभागाकडे केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत दौंड वनविभागाने गेल्या दोन दिवसांपासून संबंधित वनक्षेत्रात रात्रंदिवस गस्त वाढवून ठोस कारवाई केली असल्याची माहिती दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली आहे..
शुभम वीरकर (रा. मलटण, ता. दौंड) यांनी त्यांच्या मालकी क्षेत्रातील माती वाहतुकीसाठी महसूल विभागाकडून रॉयल्टी घेतली असली, तरी वन विभागाच्या रस्त्याचा वापर करण्यासाठी आवश्यक ती परवानगी अद्याप घेतलेली नव्हती. याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर वनविभागाने तात्काळ कारवाई करत संबंधित ठिकाणी कॅम्प उभारला आहे.
शुभम वीरकर, रामभाऊ शिवाजी वीरकर यांच्याविरुद्ध वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील चौकशी तपास वनपाल दौंड करीत असल्याची माहिती दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी दिली आहे..
याबाबत राहुल काळे यांनी अशी माहिती दिली आहे की, “वन राखीव क्षेत्रातून विनापरवानगी कोणतीही माती अथवा इतर साहित्याची वाहतूक केल्यास संबंधितांविरुद्ध वन कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. वन व वन्यजीवांचे संरक्षण करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे.” स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीमुळे वनविभाग व ग्रामस्थांमधील योग्य समन्वयामुळे बेकायदेशीर माती व वाळू वाहतूक रोखण्यात वनविभागाला यश आले आहे.
वनक्षेत्रातून बेकायदेशीर माती वाहतूक होऊ नये, यासाठी वनविभागा मार्फत रस्त्यावर चर खोदण्याचे कामही करण्यात आले असून, त्यामुळे अवैध वाहतुकीला प्रभावी प्रतिबंध करण्यात यश आले आहे. या सततच्या गस्तीमुळे वनक्षेत्रातील बेकायदेशीर हालचालींवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले आहे.
या गस्तीचे नेतृत्व दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी केले आहे. त्यांच्या समवेत शरद शितोळे, बाळू अडसूळ, बापू जेडगे, शुभांगी मुंडे, नाना चव्हाण, वाय. के. नाईकवाडी आदी वन कर्मचारी उपस्थित होते.

