| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
बिरोबावाडी (ता. दौंड) येथील गावडेवस्ती परिसरात पाळीव प्राण्यावर बिबट्याने केलेल्या हल्ल्यात प्रमोद बाळासाहेब गावडे यांची एक शेळी ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गावडेवस्ती परिसरात बिबट्याचा वावर असल्याच्या तक्रारी वन विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर दौंड वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. या वेळी दौंड वनपरिक्षेत्र राहुल काळे यांनी यांनी ग्रामस्थांशी संवाद साधत बिबट व मानव संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्यात येईल बाबत माहिती दिली.
काळे यांनी सांगितले की, बिबट दिसल्यास त्याचा पाठलाग करू नये. लहान मुलांना एकटे सोडू नये. अंधारात एकटे फिरताना मोबाईलवर आवाज किंवा गाणी सुरू ठेवावीत. बिबट समोर आल्यास खाली वाकू नये. रात्री उघड्यावर झोप टाळावी. लहान मुलांची पालकांनी विशेष काळजी घ्यावी. स्वसंरक्षणासाठी काठी बाळगावी. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवावा तसेच अंगणाला जाळीचे कंपाऊंड करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
या वेळी पाटस वनरक्षक रामेश्वर तेलंग्रे, वाळकी वनरक अक्षय शितोळे उपस्थित होते. तसेच तात्याराम गावडे, आप्पा गावडे, दिनकर गावडे, जयेश गावडे, आदित्य गावडे, आर्यन गावडे, प्रमोद गावडे, सखाराम गावडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
बिबट व मानव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहावे. बिबट दिसल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल काळे यांनी केले.
