| दौंड : प्रतिनिधी
  बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी

पाटस (ता. दौंड)  जिल्हा परिषद गटात झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार अनुराधा सत्वशील शितोळे यांनी १९३४ मतांच्या फरकाने विजय मिळवत भाजपच्या उमेदवार वैशाली साहेबराव वाबळे यांचा पराभव केला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर भाजप ने निर्माण केलेला बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या गटात राष्ट्रवादीच्या विजयामुळे भाजपला मोठा धक्का बसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पाटस जिल्हा परिषद गटातील मतमोजणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुराधा शितोळे यांना १३,४३० मते, भाजपच्या वैशाली वाबळे यांना ११,४९६ मते मिळाली. तर बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार प्रियांका सचिन आटोळे यांना ५७७ मते, संभाजी ब्रिगेडच्या सारिका अविनाश मोहिते यांना १६९ मते मिळाली. या गटात नोटा ला २४७ मते मिळाली आहेत. अखेर अनुराधा शितोळे यांनी निर्णायक विजय मिळवला.

तर दौंड पंचायत समितीच्या पाटस गणातही राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी संपतराव ढमाले यांनी २,९५७ मतांच्या फरकाने विजय मिळवला. ढमाले यांना ७,७२८ मते, भाजपचे उमेदवार नितीन आदरसिंग शितोळे यांना ४,७७१ मते, तर संभाजी ब्रिगेडचे अविनाश अरविंद मोहिते यांना ११७ मते मिळाली. या गणात नोटा ला १८२ मते मिळाली.

तर दुसरीकडे, कुरकुंभ पंचायत समिती गणात भाजपला यश मिळाले आहे. भाजपचे उमेदवार राहुल हनुमंत भोसले यांनी ३४३ मतांच्या फरकाने विजय मिळवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुरस्कृत केलेले उमेदवार उत्तम मुरलीधर आटोळे यांचा पराभव केला. भोसले यांना ५,८२८ मते, उत्तम आटोळे यांना ५,४८५ मते, तर अपक्ष उमेदवार राहुल सुरेश शितोळे यांना १,७०० मते मिळाली. या गणात नोटा ला १०८ मते मिळाली.

एकूणच पाटस परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली असून, काही ठिकाणी भाजपला समाधानकारक यश मिळाले आहे. निवडणूक निकालामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *