| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील नानविज येथील राज्य राखीव पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्यपदी अधिकारी जयश्री देसाई यांची नेमणूक झाली आहे. विशेष म्हणजे, या केंद्राच्या स्थापनेपासून प्रथमच एका महिला अधिकाऱ्याने हे पद भूषवले आहे.
या पदावर पूर्वी कार्यरत असलेले वरिष्ठ अधिकारी रामचंद्र केंडे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी जयश्री देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस सेवेत कार्यरत असताना विविध ठिकाणी यशस्वी कार्य करत आलेल्या देसाई यांचा प्रशिक्षण क्षेत्रातही उल्लेखनीय अनुभव आहे.
राज्यसेवेतील आघाडीची महिला अधिकारी
२०११ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पोलिस उपअधीक्षक पदासाठी महिलांमध्ये अव्वल क्रमांक पटकावणाऱ्या देसाई यांनी रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, गंगापूर आणि जुन्नर या ठिकाणी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच, नाशिक येथील पोलिस प्रबोधिनीमध्ये अधीक्षक म्हणून त्यांनी प्रशिक्षण क्षेत्रातील कामाचा अनुभव घेतला आहे.
प्रशिक्षणाचा दर्जा वाढवण्यावर भर
नानविज येथील प्रशिक्षण केंद्रात सध्या राज्यभरातून आलेल्या जवळपास ८०० प्रशिक्षणार्थींना विविध टप्प्यांत प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात शारीरिक तंदुरुस्ती, आधुनिक शस्त्रांचे वापर, कायदे यांसारख्या अनेक बाबींचा समावेश आहे. देसाई यांनी प्रशिक्षणार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर लक्ष केंद्रीत करत, प्रशिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्याचे संकेत दिले आहेत.
राज्यभरातील एसआरपीएफ भरतीसाठी महत्त्वाचे केंद्र
१९८८ साली स्थापन झालेले हे केंद्र २०१० मध्ये स्वतंत्र प्रशिक्षण आस्थापना म्हणून मान्यता प्राप्त झाल्यापासून SRPF गट क्रमांक ५ च्या मार्गदर्शनाखाली कार्यरत आहे. महाराष्ट्रातील १९ राज्य राखीव पोलीस गटांमध्ये भरती झालेल्या तरुणांना येथे नऊ महिन्यांचे विशेष प्रशिक्षण दिले जाते. यात पारंपरिक प्रशिक्षणासोबतच कमांडो कोर्स आणि निमलष्करी पद्धतीचेही घटक समाविष्ट आहेत.

