| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड शहरातील जनता कॉलनी परिसरात गुरुवारी दि.२२ रोजी रोड रोलरच्या धडकेत चार वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर रोड रोलर चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती असून, या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडेचारच्या सुमारास जनता कॉलनी रोडवर मगलर कॅफेजवळ आर्यन संतोष जाधव (वय ४) हा उभा असताना रोड रोलर चालकाने रस्त्याची परिस्थितीकडे दुर्लक्ष करून पाठीमागे न पाहता भरधाव वेगात रिव्हर्स घेतला. यावेळी आर्यनला जोराची धडक बसली. रोड रोलर आर्यनच्या अंगावरून गेल्याने त्याला गंभीर दुखापत झाली व तो मृत्युमुखी पडला, असे तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणी संतोष मारुती जाधव (वय ३४, व्यवसाय मजुरी, सध्या रा. दौंड शुगर कारखान्याजवळ, आलेगाव, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली. त्यावरून आरोपी परशुराम शंकर राठोड (रा. अंकलगा, ता. जेवर्गी, जि. गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरोधात दौंड पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.का. कलम १०६(१), २८१, १२५(अ) (ब) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४, १३४/१७७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल करण्याचे काम पोलिस हवालदार म्हेत्रे यांनी केले असून, पुढील तपास सहायक पोलिस अविनाश गायकवाड करीत आहेत.
घटना घडलेल्या परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भरवस्तीतील रस्त्यांवरील अवजड वाहनांच्या हालचालींबाबत सुरक्षितता उपाययोजना कडक करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
