
| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी वयोवृद्ध जोडप्याच्या घरात घुसून जबरी मारहाण करत लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा दौंड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्री 11.45 च्या सुमारास पोपट आप्पासाहेब अवचर यांच्या घरी घडली. पोपट अवचर व त्यांची पत्नी झोपेत असताना तीन अनोळखी इसमांनी घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यांनी दोघांनाही मारहाण करत गंभीर दुखापत केली आणि त्यांच्या घरातून अंदाजे 1 लाख 88 हजार किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरी करून फरार झाले.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून वयोवृद्ध जोडपे अजूनही उपचार घेत आहेत. दरम्यान, पोलीस तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले असले तरी, अद्याप कुठलीही ठोस कारवाई झाली नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष वाढताना दिसत आहे.
गुन्ह्यांचे सत्र सुरूच…
दौंड तालुक्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे:
गिरमे येथे धारदार शस्त्राने खून
यवत जवळ जळालेला मृतदेह आढळून येणे
पाटस येथील जमिनीच्या वादातून गंभीर हल्ला
स्वामी चिंचोली येथे वारीच्या प्रवाशांवर कोयत्याचा धाक, महिलांच्या डोळ्यात तिखट टाकून दरोडा व बलात्कार
या घटनांच्या मालिकेमुळे पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर नागरिकांकडून तीव्र टीका होत आहे.
नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण
सतत घडणाऱ्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांच्या कार्यशैलीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. “पोलिसांचे गस्त कमी आहे का?”, “गुन्हेगार बेधडक का झाले आहेत?” अशा चर्चा नागरिकांत रंगू लागल्या आहेत.
प्रशासन व पोलिसांनी या घटना गांभीर्याने घेऊन त्वरीत कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

