| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील यवत पोलीस स्टेशन हद्दीत सुरू असलेल्या घरफोडी चोरीच्या सत्राचा उलगडा करण्यात यवत पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत घरफोडी चोरीचे एकूण १० गुन्हे उघडकीस आले असून दोन मोक्का गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या सराईत आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार दि, ६ जानेवारी रोजीच्या पहाटे सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास वाखारी (ता. दौंड ) येथे फिर्यादी यांच्या राहत्या घराचा कडी-कोयंडा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला. किचनमधील लोखंडी कपाटातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण १ लाख ९८ हजार ६७१ रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. तसेच सांवत सुभाष शेळके यांच्या घरातही चोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. या प्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासा दरम्यान यवत पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी तसेच गुप्त बातमीदारांकडून माहिती गोळा केली. मिळालेल्या माहितीनुसार पोलीस हवालदार गुरुनाथ गायकवाड, विकास कापरे यांना संशयित आरोपींबाबत माहिती मिळाल्यानंतर यवत पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.
या तपासादरम्यान रुकुल उर्फ अमर दशरथ चव्हाण (वय ३१, रा. न्हावरा ता. शिरूर) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपल्या साथीदारांसह घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याचे साथीदार महेश संभाजी भोसले (वय २२ वर्षे ) रा. गुंडेगाव ता. जि. अहिल्यानगर व अमोल शास्त्री भोसले (वय २० वर्षे ) रा. न्हावरा ता. शिरूर यांना अटक करण्यात आली.
तपासात आरोपींनी यवत पोलीस स्टेशन हद्दीत ६ व उरळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीत ३ अशा एकूण १० घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपींनी अहिल्यानगर येथील सराफ व्यापारी किरण विलास बुरहाडे (वय ४६, रा. माळीवाडा, फुलार गल्ली, अहिल्यानगर) यास विक्री केल्याचे उघड झाले असून त्यालाही या गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
मुख्य आरोपी रुकुल उर्फ अमर चव्हाण हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घरफोडी चोरी, दरोडा, जबरी चोरी व आर्म ॲक्टचे एकूण १० गुन्हे विविध पोलीस ठाण्यांत दाखल आहेत.
तसेच उंब्रज (जि. सातारा) व शिरूर पोलीस स्टेशन येथे त्याच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आलेली असून तो दोन मोक्का गुन्ह्यांमध्ये फरार होता.
दरम्यान, या सराईत फरार आरोपीस जेरबंद करण्यात यवत पोलीस स्टेशनच्या पथकास मोठे यश मिळाले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, बारामती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार व दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख तसेच स्थानिक गुन्हे शाखा व यवत पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तरित्या केली.
