| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
कानगाव (ता. दौंड) येथील गेले तेरा दिवस विठ्ठल मंदिर परिसरात सुरू असलेल्या शेतकरी धरणे आंदोलनाला दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश आप्पा थोरात यांनी मंगळवार, दि. ३० रोजी भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करून आंदोलनातील मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. शेतकरी हिताच्या सर्व मागण्या तातडीने मान्य करून निर्णय घ्यावा यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचे व योग्य धोरण राबवण्याचे आश्वासनही त्यांनी आंदोलकांना दिले.
शेतकरी आक्रोश कृती समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये कांद्याला ३५ रुपये हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती व्हावी, ऊसाला ५ हजार रुपये प्रति टन बाजारभाव मिळावा, दुधाला ७० रुपये व म्हशीच्या दुधाला १०० रुपये हमीभाव मिळावा, शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यात यावेत, भाकड जनावरांच्या खरेदीसाठी शासकीय केंद्र सुरू करावे, कापसाला १२ हजार व सोयाबीनला १० हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळावा तसेच क्षारपड जमिनीसाठी पाझरचाऱ्या व पानंद रस्ते तयार करण्यात यावेत अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी दौंड शुगरचे संचालक वीरधवल जगदाळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, शेतकरी संघटनेचे शिवाजी नांदखीले, अनिल चव्हाण, शरद जोशी विचार मंचाचे विठ्ठल राजे पवार, भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष अशोक फडके, आरएसएसचे गणेश आखाडे, प्रहार संघटना, लोककल्याण आधार मंच, राष्ट्रीय समाज पक्ष, भैरवनाथ ज्येष्ठ नागरिक संघ, दौंड तालुका एसटी साईट्स फर्टीलायझर्स डीलर्स असोसिएशन आदींचा समावेश आहे.
प्रशासनाकडून नायब तहसीलदार ममता भंडारे, पाटस मंडल अधिकारी, कृषी अधिकारी रेखा पिसाळ, कानगाव तलाठी शाईन सय्यद, तसेच कानगाव पोलीस पाटील विठ्ठल बारवकर यांनीही आंदोलन स्थळी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला.
आंदोलन दरम्यान, कुसेगाव, पाटस, मांडवगण, कडेठाण, नाव्हरा, पारगाव, सादलगाव, हंगेवाडी, बाभुळर, पडवी, पिंपळगाव, वरवंड, गार, सोनवडी आदी गाव व ग्रामपंचायतींनी या शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे.
शेतकरी आक्रोश कृती समितीच्या म्हणण्यानुसार शासनाने लवकर निर्णय न घेतल्यास येणाऱ्या दहा दिवसांत आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.
