| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील केडगाव येथील आंबेगाव पुनर्वसन भागात एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरा-बायकोच्या कौटुंबिक वादात ११ महिन्याच्या चिमुकल्याचा त्रिशूळ लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यवत पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन मेंगावडे आणि त्याची पत्नी पल्लवी यांच्यात घरगुती वाद सुरू होता. यावेळी फिर्यादी भाग्यश्री सचिन मेंगावडे आपल्या ११ महिन्यांच्या मुलगा अवधूत याला कडेवर घेऊन हे भांडण सोडवण्यासाठी नितीन आणि पल्लवी यांच्या घरात गेल्या होत्या.
भांडण अधिकच उग्र झाल्याने पल्लवीने रागाच्या भरात नितीनवर त्रिशूळाने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीनने ते टाळल्यामुळे त्रिशूळ चुकून जवळच उभ्या असलेल्या भाग्यश्री यांच्या कडेवर असलेल्या अवधूतच्या डोक्यात घुसला. त्रिशूळाचा जोरदार घाव लागल्यामुळे अवधूत या निष्पाप चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पल्लवी, तिचा पती नितीन आणि तिचा दीर यांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.
तसेच, घटना घडल्यानंतर आरोपींनी रक्त आणि त्रिशूळ पुसून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. याप्रकरणी भाग्यश्री सचिन मेंगावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यवत पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेतील बी.एन.एस. कलम 105, 238, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. केवळ कौटुंबिक वादाच्या झगड्यात एक निष्पाप जीव बळी गेला असून, ही घटना समाजमन हादरवणारी आहे.
ही अत्यंत दु:खद घटना आहे. या चिमुकल्याचा निरागस चेहरा पाहून हृदय पिळवटून येतं. कोणतीही चूक नसताना एका निष्पाप बालकाचा जीव कौटुंबिक वादामुळे गेला, ही गोष्ट खरोखरच समाजासाठीही डोळे उघडणारी आहे.

