| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथील इन्फोकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून मौल्यवान कॉपर केबल चोरीप्रकरणी दौंड पोलिसांनी तातडीची कारवाई करत ८ आरोपींना अटक केली असून एकूण १२ लाख २१ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे अल्ताफ चांदशेख (रा. स्वामी चिंचोली), सोनू मोईन अहमद, शाह आलम रोशन अली, दीपक कुमार शिवचरण, अर्जुन कुमार निगम, नूर मोहम्मद खलील, अतिक रहिमान हजरत अली खान, हनुमंत अंगद लिमकर हे मूळ राहणार ( चंपापुर शहर, गड जिल्हा सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश, सध्या रा. गुणवरे वस्ती, स्वामी चिंचोली, ता. दौंड) यांना ताब्यात घेण्यात आले.
बुधवार दि ७ रोजी सकाळी १० वाजण्यापूर्वी अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या हद्दीतून काळ्या रंगाच्या प्लॅस्टिक आवरण असलेली 4cx240 sq mm आकाराची ५० मीटर लांबीची कॉपर केबल चोरी केली होती. या केबलची किंमत २ लाख २१ हजार ८५० रुपये असून, या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी तात्काळ तपास पथक नेमण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दौंड पोलिसांनी गोपनीय बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत संशयित आरोपींचा शोध घेतला असता तपासादरम्यान वरील आरोपी ना ताब्यात घेतले..
आरोपींकडील इनोवा कार (क्रमांक MH 13, AC- 0786) ची झडती घेतली असता चोरीस गेलेली कॉपर केबल मिळून आली. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. सदर इनोवा गाडी (अंदाजे किंमत १० लाख रुपये) जप्त करण्यात आली आहे.
या कारवाईत एकूण १२ लाख २१ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास दौंड पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कुरकुंभ मदत केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे करीत आहेत.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर वाघमारे, पोलीस हवालदार किरण पांढरे, निखिल जाधव, अमीर शेख, नितीन बोराडे, सुभाष राऊत तसेच पोलीस कॉन्स्टेबल संजय कोठावळे यांनी केली आहे.
