| इंदापूर : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
इंदापूर आणि माळशिरस परिसरात दहशत माजवणाऱ्या कुख्यात राजू भाळे टोळीवर वालचंदनगर पोलिसांनी मोक्का अंतर्गत धडक कारवाई केली आहे. टोळीप्रमुख राजेंद्र उर्फ राजू महादेव भाळे याच्यासह १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी या कारवाईस मंजुरी दिली आहे. सर्व आरोपी सध्या कारागृहात असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
२७ फेब्रुवारी २०२५ रोजी इंदापूर तालुक्यातील निमसाखर येथे श्रेय वादातून उत्तम जाधव याचा निर्घृण खून झाला होता. या प्रकरणात आरोपी राजू भाळे व त्याच्या साथीदारांना वालचंदनगर पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर या टोळीचा गुन्हेगारी इतिहास तपासून मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आला.
या टोळीतील सदस्यांवर खून, मारहाण, दहशत माजवणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे धनाजी मसुगडे व निरंजन पवार यांच्यावर दुसऱ्यांदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
“राजू भाळे टोळीची दहशत मोडून काढण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारीवर पोलिसांचा कठोर पवित्रा कायम राहील,” अशी माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.