| इंदापूर : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव येथे सोमवारी दि, 11 ऑगस्ट रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गढी व समाधीस्थळावरील अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन झाले. या दरम्यान महामार्गावर तासभराहून अधिक काळ वाहतूक ठप्प झाली होती.
रास्ता रोको आंदोलनात शिवचरित्रकार अनिल महाराज देवळे आणि भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे उपस्थित होते. यवत घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सतर्कता ठेवत मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
दरम्यान, तहसीलदार जीवन बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व नगरपरिषदेच्या उपस्थितीत गढीवरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आली. गुरुवार दि. 7 रोजी 14 अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन स्वतःहून अतिक्रमण काढण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आदेशाचे पालन न झाल्याने सोमवारी सकाळी 11 वाजल्यापासून प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात करण्यात आली.
रास्ता रोकोमुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही प्रवाशांनी याबाबत संताप व्यक्त केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत झाली.
