| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
चौफुला परिसरात गावठी पिस्टलचा धाक दाखवत दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन आरोपींना यवत पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक करून त्यांच्याकडून अवैध गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त केले आहे. गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना न्यायालयासमोर हजार केले असता न्यायालयाने सोमवार दि. १५ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती यवत पोलिस निरिक्षक संतोष तासगावकर यांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शुक्रवार दि. १२ रोजी सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास बोरीपार्धी (ता. दौंड ) येथील रेणुका कला केंद्रामध्ये आरोपी मयूर दत्तू पाटील (वय २६) व पवन कल्लू बर्मी (वय २१, दोघेही रा. पिंपळवाडी रोड, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे) यांनी बेकायदेशीररित्या गावठी पिस्टल व जिवंत काडतूस जवळ बाळगून सोमनाथ छगन माने (वय ३०, रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर, पुणे) यांना शस्त्राचा धाक दाखवत शिवीगाळ व दमदाटी केली. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या प्रकरणी फिर्यादी सोमनाथ माने यांनी दिलेल्या तक्रारीवरून यवत पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील कलम ३५२, ३५१(२), ३(५) तसेच भारतीय हत्यार कायदा कलम ३ व २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा घडल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले होते. त्यांचा तातडीने शोध घेण्यासाठी यवत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज यांनी विशेष पथक तयार करून शोधमोहीम सुरू केली.
तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रभावी कारवाई करत गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासांत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेले अवैध गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.
यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध शस्त्रे बाळगणारे व दहशत निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांविरोधात सातत्याने कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज करीत आहेत.
ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड बापुराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईत पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर, पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक बाळकृष्ण गाडेकर, पोलीस हवालदार परशुराम म्हस्के, मेघराज जगताप, संदीप करे, किशोर मोहिते तसेच पोलीस कॉन्स्टेबल प्रतिक धिवार व दादा जाधव यांनी सहभाग घेतला.
