| दौंड : प्रतिनिधी
बीबीसीस्काय न्युज मराठीसाठी
आपल्या सर्वांना चांगल्या मार्गाने काम करायचं आहे. शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जायचं आहे. कोणालाही न दुखावता सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं आहे. तुम्ही मला साथ द्या, मी तुम्हाला साथ देईन,” असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दौंडकर जनतेला दिले आहे. दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या जाहीर पक्ष प्रवेश सभेत ते बोलत होते.
या कार्यक्रमात भाजपचे माजी पदाधिकारी स्वप्नील शहा, मनोज फडतरे, नंदूभाऊ पवार यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यामुळे दौंड तालुक्यातील राजकीय समीकरणात मोठे बदल घडणार असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी अजित पवार म्हणाले की, अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावं. नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारण्यास लावू नयेत. जर काम होणार नसेल तर तसे स्पष्ट सांगावे, पण लोकांना त्रास देऊ नका. दौंड तालुक्यात प्रशासनाने काळजीपूर्वक काम केले पाहिजे. कोणाकडून काय सांगितले म्हणून गुन्हे दाखल करू नयेत. कायदा-सुव्यवस्था राखली पाहिजे आणि संविधानाचा आदर झाला पाहिजे. ज्या पद्धतीनं पिंपरी-चिंचवडमध्ये जाती-पातीचा, नात्या-गोत्याचा विचार न करता आम्ही विकास साधला; अगदी त्याचप्रमाणे आता दौंडच्या विकासालाही गती द्यायची आहे. दौंडमधील नागरिकांनी शहर स्वच्छ, सुंदर आणि सुसंस्कृत ठेवण्यासाठी सक्रिय भूमिका घ्यावी. नद्या आणि पर्यावरणाचं रक्षण हे आपलं सामूहिक कर्तव्य आहे. मोबाईल आणि ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या व्यसनाबाबत उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. अनेक तरुण ऑनलाइन गेमच्या आहारी जाऊन वेळ आणि पैशाची नासधूस करत आहेत. पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले स्वप्नील शहा म्हणाले की, तीन पिढ्या भाजपमध्ये काम केलं, पण विकास न झाल्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. दौंड नगरपरिषद निवडणुकीत २६ – ० असा निकाल लावू, असा विश्वास त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व्यक्त केला. यावेळी प्रसंगी स्वप्नील शहा यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी १ लाख ५५ हजार ५५५ रुपयांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुपूर्द केला. अजित पवार यांनी त्यांचे आभार मानत सामाजिक उत्तरदायित्व जपल्याबद्दल अभिनंदन केले.
दौंड तालुक्यातील पोलिस आणि महसूल खात्यांबाबत नागरिकांना त्रास होत असल्याचे माजी आमदार रमेश थोरात यांनी सांगितले. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष या समस्येकडे वेधले आणि दौंड शहराच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवली जात नाही, आता बदलाची वेळ आली आहे, असे म्हटले.
या प्रवेशामुळे दौंड तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला असून, आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने आपली ताकद दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
या वेळी माजी आमदार रमेश थोरात, प्रदीप गारटकर, वैशाली नागवडे, सागर फडके, वीरधवल जगदाळे, नितीन दोरगे, गुरुमुख नारंग,रमेश भोसले यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

